Sunday, November 14, 2010

ओंजळ

ओंजळ

 काहीच नाही राहत ओंजळीत जेव्हा माणसं दुरावतात
काही नव्हतंच ओंजळीत जेव्हा ती जवळही असतात

कुणास ठाऊक आठवणींची ओंजळ रीती होती का कधी
 वाटे भरुन वाहेल अशी भीती होती अधी मधी

पण भीती ती फुकाची खरी कधी ठरलीच नाही
भीतीच्या छायेखाली खरी बात ती कळलीच नाही

काही केल्या ही ओंजळ बघवत नाही आता
फुकाच्या विचाराने का फोडला होता मी माथा

रात्र जातील, दिवस जातील ओंजळही विसरली जाईल
पाणी नव्हतंच नदीला, मग ती आटून तरी कुठून जाईल.