हा रविवार का बरं वांझोटा? त्या दिवशी (म्हणजे रविवारी) आघाडीच्या चर्चेतून काहीच निष्पन्न नाही झाले म्हणून? त्या दिवशी सत्तास्थापनेच्या दृष्टीने काही घडले नाही म्हणून का रविवार वांझोटा? मी म्हणते कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी गर्भार असताना रविवारला वांझोटा म्हणत का बरं दोष द्यायचा? निवडणुकीचा निकाल लागून १०-१२ दिवस उलटून गेले म्हणजेच आघाडी १०-१२ दिवसांची गरोदर आहेच म्हणा की!
हे इतके दिवस म्हणजे सत्तास्थापनेस बराच विलंब असं सगळीकडून म्हटलं जात आहे. पण आघाडीच्या बाजूने स्पष्ट बहुमताचा कौल देणा़र्या सुज्ञ मतदारहो, जरा हा विचार करा, केवळ १०-१२ दिवसांची गरोदर असलेल्या (कॉंग्रेस-राष्ट्रवादी) आघाडी मातेला जवळपास ७०-८० (७०-८० ही मंत्रिमर्यादा जम्बो मंत्रिमंडळाचे आजकाल फॅड असल्यामुळे गृहीत धरण्यात आलेली आहे.) मंत्र्यांना जन्म द्यायचा म्हणजे ही गंमत थोडीच आहे? आजपर्यंत पृथ्वीवरच्या कुठल्या प्राणीमातेने इतक्या जास्त मुलांना इतक्या कमी वेळात जन्म दिला असेल? मनुष्यमातेला तर एका अपत्याला जन्म देण्यासाठी ९ महिने गर्भ वाढवावा लागतो. मग इकडे आघाडी मातेला ७०-८० मंत्रिमहोदयांना जन्माला घालायचं म्हणजे किती काळ लागेल बुवा...? विचार आणि आकडेमोड न केलेलीच बरी. त्यात पुन्हा जुळं-तिळं धरायचं म्हणजे गणिती किचकट वाढते की.
ते काहीही असो, ज्याप्रमाणे आपण निवडणुकीत आघाडीवर विश्वास दाखवला त्याचप्रमाणे आताही या मातेला शुभाशिर्वाद देऊ आणि जसजसे मंत्री जन्माला येतील तसतसे त्यांचे स्वागत करू. फक्त स्वागतच बरं का. बारशाचे टेन्शन आपण नाही घ्यायचं. ते थाटामाटात करायला कार्यकर्ते आहेत की!