Wednesday, November 25, 2009

सलाम करो, सबको सलाम!!




         काय मग मित्रहो, दिवसाची सुरवात कशी झाली आपल्या? आठवणींनी ना, २६/११ च्या? होणारच. वर्तमानपत्रे, वृत्‍तवाहिन्या (आपली News channels हो!) या लोकांनी आपल्याला हा दिवस विसरू दिलाच नाही मुळी. हा, मध्ये मध्ये विसरलो होतो आपण पण २६ नोव्हेंबर जवळ आला की आठवतं सर्व काही, नाही का? चालायचंच. हे असंच होणार, जसं या वर्षीच्या २६/११ होतंय. तसंच पुढच्या वर्षीही होणार. शहिदांना श्रद्‍धांजली आणि पोलिसांना मानवंदना. आणि याला एक मस्त नाव दिलंय आपण- "Anniversary of 26/11" आणि यातून काय दाखवतोय आपण- "Mumbai Spirit". Great!! Really, Great Mumbai!! Hats off to the people who shout this is Mumbai spirit. पाडगावकरांच्या भाषेत सांगायचं तर सलाम! सर्वांना सलाम!! पाहायचंय कुणाकुणाला सलाम???

सलाम भाई-बहनों सबको सलाम,
ताज हॉटेलवरचं ऑपरेशन सलग दुसर्‍या दिवशीही चालू आहे हे कळताच बघ्यांची गर्दी करणार्‍या सगळ्यांना सलाम,
रस्त्यावर उतरून, निदर्शने करून, मेणबत्‍त्या लावून, शोकसभा आयोजित करून मिडीयासमोर झळकण्याची आशा पूर्ण करणार्‍या Celebritiesनाही सलाम;
सलाम मेरे भाई-बहनों सबको सलाम!!
Commando Operation Live Telecast करून त्याचे Upadates हल्‍ल्याचा MasterMindपर्यंत पोहोचवणार्‍या MEDIAला सलाम,
"तुमचे प्रियजन या हल्‍ल्यात मृत्यूमुखी पडले, काय वाटतंय तुम्हाला?" असं विचारणार्‍या Reportersना सलाम;
सलाम भाई-बहनों सबको सलाम!!
’त्या’ आतंकवाद्यांना बनावट IDs, Bank Accounts, Credit Cards, International Phones मिळवून देणार्‍या सगळ्यांना सलाम,
FBI च्या सूचना मनावर न घेणार्‍यांना सलाम;
सलाम भाई-बहनों सबको सलाम!!
’त्या’ आतंकवाद्यांना भारतात गुजरातमधून घुसू देणार्‍यांना सलाम,
हंगामा माजवल्यानंतर एक कोटीची मदत देऊ करणार्‍याला सलाम;
सलाम भाई-बहनों सबको सलाम!!
करकरेंच्या जाकीटची फाईल गहाळ करणार्‍याला सलाम,
तडफडणार्‍या साळसकरांना पाणी न देणार्‍याला सलाम;
सलाम भाई-बहनों सबको सलाम!!
तीन दिवसानंतर दिग्दर्शक आणि पोराला घेऊन ताज मध्ये पाऊल ठेवणार्‍याला सलाम,
तर "बडी बडी शहरों में छोटी छोटी बातें होती रहती हैं" म्हणणार्‍या आबांना सलाम;
सलाम भाई-बहनों सबको सलाम!!
मेला की लाख, जखमी झाला की काही हजार घोषित करणार्‍यांना सलाम,
उलटी-सुलटी विधाने करून दिशाभूल करणार्‍यांना सलाम;
सलाम भाई-बहनों सबको सलाम!!
काही महिन्यांच्या आतच सगळं विसरून निवडणूक लढवणार्‍या नेत्यांना सलाम,
एवढंच नव्हे कामटे, करकरे, साळसकरांची होर्डिंग्ज लावून पक्षाचा प्रचार करणार्‍यांना सलाम;
सलाम भाई-बहनों सबको सलाम!!
सहा महिन्यांनी खटला सुरू करणार्‍या सरकारला सलाम,
Legacy राहिली बाजूला पण, कसाबचं वकीलपत्र प्रसिद्‍धीसाठी घेऊ इच्छिणार्‍यांना सलाम;
सलाम भाई-बहनों सबको सलाम!!
आणि एवढे सगळे सलाs..म ठोकताना माझ्या क्रोधाला, रडण्याला, आक्रंदणार्‍या मनाला मात्र..
लगाs..म!!!
आजचा दिवस मुंबई; पण उद्या काय, परवा कोण...?
कदाचित पुणे, नागपूर, नाशिक की गोवा??
हैद्राबाद, बंगळूर, आसाम की नेहमीचंच कश्मीर???
बहुतेक प्रत्येकाच्या वाट्याला एक एक दिवस येईल.. हल्‍ल्याची Aniversary सेलिब्रेट करायला...
नाही! नाही!! अशी भीती मनात येतच राहते, याला उत्‍तर ते काय???
याला फक्‍त एकच उत्‍तर- लगाs..म!!!

जत्रा

         जत्रा म्हटलं की डोळ्यासमोर काय येतं हो? मला माहितेय, जत्रा म्हटलं की समोर येऊन उभा राहतो तो भरत जाधव, ओं..ओं.. करत, कोंबडी पळाली म्हणत. आणि मग आपणच जागच्या जागी टुणटुण उड्या मारायला लागतो. ओंजळीभर पाण्याने बाटलीत खुळखुळाट करावं ना तसं आपल्या मनाचं शरीरात चालत असतं.
पण जत्रा म्हटलं की अजूनही काही आठवत असेलच ना. आठवलं का?? हो, अगदी बरोबर. जत्रा म्हणजे जत्रा. त्याचा वेगळा अर्थ तो काय सांगायचा? पण जत्रा म्हणजे फेअर किंवा फेस्टिव्हल्स नव्हे. हो, पण तुम्हाला माहितेय मी जत्रांबद्‍दल मी का बोलतेय ते? कारण अगदी सोप्‍पं आहे. आमच्या कोकणात आता जत्रांचा मोसम चालू झालाय. कोकणात हिवाळा हा जितका थंडीचा मोसम असतो तितकाच तो जत्रांचाही असतो. आणि काय सांगू तुम्हाला जत्रा माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. लहानपणीचे दिवस कोणते कोणते हे जर गोळा करू लागले ना तर मला त्यात जत्रेचे दिवसही मोजावे लागतील. आणि अशा या माझ्या आवडत्या जत्रांना मी गेली चार वर्षे फार मिस केलं हो. माझ्या गावालाही मला जाता आलं नाही. यावेळी मात्र अगदी पहिली जत्रा झाल्यापासून मी पप्‍पांच्या पाठीमागेच लागले, ’सांगा आपल्या गावची जत्रा कधी?’ उत्‍तर एकच- ’अजून वेळ आहे गं’. शेवटी एकदाची ती वेळ आली आणि परवाच मी आरोंद्याला जाऊन आले. तुम्हाला सांगते आपल्या ’गावची जत्रा कधी?’ याचं जे कुतूहल असतं ना ते एखाद्या घनिष्ट (आणि कधी कधी क्लिष्टही) अशा आपल्या आप्तेष्टाचं ’लग्‍न कधी?’ या कुतूहलाइतकं असतं. जेव्हा गावात एकापेक्षा अधिक जत्रा असतात तेव्हा तर हे कुतूहल अधिकपट असतं. सातेरीची जत्रा, गिरोबाची जत्रा, माऊलीची जत्रा वगैरे, वगैरे. पण आमच्या आरोंद्यात मात्र एकच मोठी जत्रा असते. सातेरी-भद्रकालीची.
तुम्हाला वाटेल माझं काय हे सतत ’आपलं गाव, आमची जत्रा’ चाललंय? मी तरी काय म्हणणार दुसरं? हा गावकी आपलेपणा जत्रेच्या वेळीच बाहेर पडतो. (होळीची धुळवड सोडली तर) इतर कुठल्याही सणासुदीला नाही बरं का. आणि आपल्या गावच्या जत्रेला जाणं हे आमच्यासाठी अनिवार्य असतंच.
जत्रेच्या दिवशी गाव कसं अगदी हुरळून गेलेलं असतं. गावतले सगळे कुटुंबकबीले देवदर्शनासाठी देवळात जातात. ओटी भरतात. तुम्हाला सांगते नवरा-बायको एकत्र गावात फिरताना दिसतात ते याच दिवशी.  इतर गावातील लोक मात्र जत्रेसाठी येतात ते संध्याकाळीच. कारण जत्रेला खरा रंग चढतो तो संध्याकाळीच. संपूर्ण देऊळ आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर विद्युत रोषणाई (अर्थात lighintingने) उजळून निघतो. देवळाच्या आवारात शिरताच एक प्रकारचा हुरूप चढतो. एरव्ही सुनी सुनी दिसणारी मंदिरं जत्रेच्या दिवशी नववधूप्रमाणे नटतात. मंदिराच्या कळसापासून भींतीवर सांडणारी lightings पाहिली ना की असं वाटतं याच नववधूने जरीचा पदरच डोक्यावर घेतलाय आणि लाघवी हास्याने स्वागत करतेय सर्वांचं. lighting पाहून झालं की नजर खिळते ती ओळीत थाटलेल्या रंगीबेरंगी  दुकानाच्या मांडणीवर. सगळ्यात जास्त जर कशाची दुकानं दिसतील तर ती खाजाची (मालवणी खाजं माहीत असेलच) आणि लहान मुलांच्या खेळण्यांची. तुम्हाला सांगते लहानपणी जेव्हा आम्ही जत्रेला जायचो तेव्हा आईबाबांकडे पहिल्यांदा फुग्याची मागणी करायचो. "पप्‍पा, मला फुगा.." कुठल्याही जत्रेत शिरलो की हाच dialog. "अगं थांब, अजून ओटी कुठे भरलीय? दर्शन कुठे झालंय देवाचं?" पप्‍पांनी असं म्हटलं की माझा थोडा हिरमोड व्हायचा. तेव्हा मला वाटायचं की जत्रा ही रंगीबेरंगी खेळणी आणि फुग्यांसाठीच असते. दर्शन काय नंतरही घेता येईल असं मला सारखं वाटायचं. पण माझं कोण ऐकणार तेव्हा?
मग चालू होतं देवळाच्या गाभार्‍यात शिरण्याची वाट काढणं. देवळापर्यंत पोहोचेपर्यंत थोडी रेलचेल, थोडी धक्‍काबुक्की यातून हा प्रवास चालू होतो. या प्रवासात मोकळ्या केसांच्या सुंदर मुली आणि जीन्‍स-जॅकेट घालून style मारणार्‍या मुलांच्या असंख्य रेल्वेही दिसतात. या रेल्वेगाडीत मी कुठच्या डब्याला जाऊन आदळणार नाही याची घरातलेही पुरेपूर घेतात. ’मेले में बिछडने जैसी’ गोष्ट होऊ नये म्हणून देवळात शिरेपर्यंत हातांची साखळी करूनच आम्ही चालतो. एकदा का देवळापाशी पोहचलो की मग प्रश्‍न उरतो चपला काढण्याचा. आता ही कुठे काढणार या विचारात पप्‍पांची एक-दोन मिनिटं जातात. मग इतर चपलांच्या ढिगार्‍यापासून बाजूला कुठल्यातरी खाचीत चपलं ठेवण्याची व्यवस्था केली जाते. त्याशिवाय चपलं नवीन खाली व वर जुनी चपलं ही काळजी घेतोच आम्ही. पण सगळ्यात मोठी पंचाईत होते, जेव्हा सगळी देवळं फिरून चपलं नेमकी कुठे काढली हे कुणालाच आठवत नाही तेव्हा. खूप शोधाशोध करून शेवटी ती मिळतात म्हणा. पण मग यावर अजूनएक उपाय सापडला तो म्हणजे केळीवाल्यांकडे केळी खरेदी करायची न चपलं राखणीला ठेवून द्यायची.
देवळात गेल्यावर सगळ्यांची एकच झुंबड उडते ती आपली ओटी सर्वात अगोदर भरण्याची. अजूनही मला माझ्या आईला ओटी भरताना बघायला फार आवडतं. तिचं ते अलगद हातांनी नारळ, तांदूळ घेऊन ओटी भरणं, मग गावकर्‍यानं गार्‍हाणं घालून झाल्यावर अलगद त्यातलं थोडं आपल्या पदरात परत घेणं हे सर्व बघताना मला फार मजा वाटते. बायका फार सोज्वळ दिसतात अशा प्रसंगाच्यावेळी. पण हे सौभाग्य फक्‍त सवाशिणींच्याच वाट्याला येतं, प्रत्येक विवाहितेच्या वाट्याला नाही याचं मला फार वाईट वाटतं.
परवा जेव्हा जत्रेला पप्पांसोबत जाऊन आले तेव्हा मात्र जत्रा जरा सुनी वाटली. दुकानं होती, पण लहान मुलांची, तसेच बायकांची झुंबड कमी दिसली. मुलामुलींच्या रेल्वेगाड्यांची ये-जा होतीच, पण काहीतरी कमी वाटत होती. नेमका जत्रेचा उत्साह कुठे हरवला तेच कळत नव्हतं. रात्री बारानंतर निघणारी देवाची पालकी आणि चालू होणारं दारूसामान बघायला मी व पप्‍पा काही थांबू शकलो नाही. परत घरी आल्यावर जेव्हा मी हा प्रश्‍न त्यांना विचारला तर काय उत्‍तर मिळालं ठाऊक आहे?
"अगं विने, आजकाल मटक्याला बंदी आणली ना सगळीकडे त्यामुळे जत्रेला फारसं कुणी येतच नाही. इतर लोकांपेक्षा या लोकांचा जत्रेतला उत्साह दुप्‍पट असतो. तोच आता मावळला ना."
लहानणी वाटायचं जत्रा फुग्यांसाठी आणि खेळण्यांसाठी असते. मग काही दिवसांनी कळलं की ती देवदर्शनासाठी असते. पण आता कळालं जत्रा हे लोकांनी एकत्र यावं, विचारांची (की पैशांची?) देवाणघेवाण व्हावी यासाठी असते.

Wednesday, November 18, 2009

अतिथी देवो भव

         आपली भारतीय संस्कृती फार प्राचीन. हीच संस्कृती आपल्याला सांगते- अतिथी देवो भव. म्हणजे घरी येणारा प्रत्येक पाहुणा हा देव असतो. त्याचं देवासमान आदरातिथ्य करावं. पण हल्‍लीचा जमाना असा आलाय ना की ’आलेला पाहुणा हा देव असेलच कशावरुन?’ याची शहानिशा केल्याशिवाय आदरातिथ्य सोडाच पण घरात पाऊलपण टाकू द्यायचं नाही असं आमचं धोरण असतं. आता आजकालच्या वातावरणात हे अयोग्य आहे असं मी म्हणणार नाही बरं का. या ’अतिथीदेवो’ची परंपरा जर पहिल्यांदा कुणी झुगारली असेल तर त्या बिल्डिंगवाल्या मंडळींनी. नुसतं ’पाहुणा’ म्हटलं (’येणार’ म्हणायच्या आतच) की यांना वाटतं ’नको रे बाबा!!’. अगदी दारावरची घंटी वाजली तरी यांना छातीत धडकी भरते. नेहमीच्या वेळची बेल नाही म्हणजे ’कोण?’ या चिंतेत इतके बुडून जातात की दरवाजाच उघडत नाहीत. अतिथी या शब्दाचा अर्थ यांच्यासाठी भयानक असं काहीतरी हा असतो.
         यापेक्षा अगदी उलटं ते म्हणजे खेडेगावातलं. तिथल्या घरांना ही असली भीती नसते. आमच्या कोकणातली कौलारु घरं (आजकाल अशा घरांची संख्याही कमी झाली हे दुर्दैव!) तर ’अतिथी’ला नेहमीच सामोरी जात असतात (कारण इथे लिहून घेतलेले पत्‍तेही इच्छित घर शोधून देऊ शकतीलच असं नाही). शेणाने सारवलेली, मातीच्या भीतींनी उभारलेली काही भव्यदिव्य घरं तर ’येवा, घर आपलाच आसा’ अशा तोर्‍यात उभी असतात. अतिथी हा शब्द त्यांना हेच सुचवतो कुणीही, कधीही, कसंही यावं. आल्या-गेल्या प्रत्येकाचं स्वागत ही घरं अगदी तटस्थपणे करतात. मग काय कुणीही येतं. किड्या-मुंग्यांपासून ते दिवडापर्यंत (दिवड = कोकणातला धामण), कुत्र्या-मांजरापासून ते बिबट्यापर्यंत, आणि वादळवार्‍यापासून ते पूरापर्यंत, कुणीही येतं, कितीही दिवस राहतं आणि कंटाळा आला की निघून जातं. अशा या प्राचीन अशा घर कम सजीववस्तू संग्रहालय वास्तूत कधी कधी अजून एक सजीव असतो, तो म्हणजे मनुष्यप्राणी. हा पण त्यांच्यासोबत कसलीही कुरबुर न करता राहत असतो. सोबती असते ते त्याचे वृधत्‍व. गाव-गप्‍पा, विडी व पान या काय त्या चैनीच्या वस्तू असतात दिवस घालवायला. शेजार-पाजार असेल तर दोनवेळचं अन्‍न पडत तोंडात. असं हे आयुष्य समाधानानं सरत असतं. त्यात सुखाचा लवलेश नसतो. खरं तर सुख ही भावना फार अगोदर अनुभवलेली असते. आता शिल्‍लक असतं ते फक्‍त समाधान, फार पूर्वी अनुभवलेल्या सुखाचं.
कोकणातल्या अशा अनेक एकाकी घरांपैकी एक घर आमच्या ओळखीचं आहे. नानूकाका हे त्या घरात राहणारे एकमेव मनुष्यप्राणी. माझ्या आईचे चुलतमामा असलेले नानूकाका हे दोडामार्गातले. हे तेच ते  सिंधुदूर्गातील दोडामार्ग जिथे कर्नाटकातल्या हत्‍तींनी घुसकखोरी करून ते जंगल कर्नाटकात असल्याचा दावा केला होता. दोडामार्गातल्या जंगलानजीक शेजारधर्म म्हणून राहणार्‍या अनेक घरांपैकी नानूकाकांचं घर एक. दहा खोल्यांच्या या घरात नानूकाका प्रत्यक्ष फक्‍त तीन खोल्यांचा वापर करतात. बाकीच्या खोल्या दिवड, वटवाघळं, इत्यादींच्या नावे केलेल्या. दोडामार्गातल्या भारनियमनामुळे नानूकाकांचं घर काही काळ शांत राहतं. उंदीर-दिवडाची लुकाछुपी तेवढी चालू असते म्हणा. पण एकदा का वीजेने घरात संचार केला की मग मात्र नानूंचा लाडका TV बडबड केल्यावाचून राहत नाही. त्याची वटवट दिवसभर चालू राहते. आणि आमचे नानूकाका पण ना, TVचे भयंकर वेडे. त्याहूनही भयंकर वेड ते बातम्यांचं. ’आज तक’वरील ’मौत का कुआ’ पासून ठाकर्‍यांचं ’मराठी युद्‍ध’ या सर्वात त्यांचा रस फार. नानूंची ही रसबाजी आमच्यापर्यंतही नेहमी पोहोचते. माझ्या वडलांची आणि नानूकाकांची आवड एकच, बातम्या चघळण्याची. अर्थात वडीलांना ऑफिसमुळे बातम्या फार वेळ नाही चघळता येत. पण निवृत्‍त झालेल्या नानूकाकांचं मात्र रवंथ चालू असतंच.
"अरे, तुला माहितेय का धन्या, वीज कोसळली वीज..."
"कुणावर?"
"कुठे आहेस कुठे तू?"
"कुठे म्हणजे काय? घरात."
"मग जरा ’अबक’ लाव, बघ ठाकरेच्या मातोश्रीवर वीज कोसळली. राज सोडून चालला बघ त्या बाळासाहेब ठाकरेना. म्हातारवयात काय बघावं लागतंय... त्यापेक्षा आपण बरे बुवा सगळे अगोदरच सोडून गेले आपणाला..."
झालं नानूकाका बाळासाहेबांच्या अव्यक्‍त दु:खाला आपल्या परिस्थितीनुसार समजावू लागले.
कधी कधी सकाळी सात वाजता नानूकाकांचा फोन,
"अगं विने, तुझा बापूस उठला का? त्याला म्हणावं सुट्‍टी आहे म्हणून झोपून का राहायचं? बघा जरा, सगळीकडे पाणीच पाणी झालंय जिल्ह्यात. गेल्या वीस वर्षांत असा पाऊस झाल्याचं आठवत नाही बघ."
इथे नानूकाका आमच्याच जिल्ह्यात झालेल्या पाऊसपाण्याला TVवर पाहण्याचा सल्‍ला देतात.
मला कधी कधी असं वाटतं नानूकाकासुद्‍धा भविष्यवाणी करतात. फ‍क्‍त तीच भविष्यं फार पूर्वी कुणीतरी केलेली असल्यामुळे नानूंच्या ’बघ मी म्हणत होतो ना’त तथ्य नसते.
"अबकड’वर दाखवलं (ते ’अबक’ आणि हे ’अबकड’ बरं का) २०१२ला जग संपणार. जगबुडी येणार. बघ मी सांगितलं नव्हतं का सगळं बुडणार म्हणून?"
तर कुठे हत्‍तींनी कसा हैदोस कसा घातला याचा पाठपुरावा जणू सरकारने यांनाच करायला सांगितल्याप्रमाणे स्वत: वनमंत्र्याच्या थाटात फटाके लावायला पुढे सरसावतात. आणि मग...? मग काय विचारता. हत्‍ती दिसले की काढतात पळ. हे फक्‍त नानूकाकांचंच कर्म असं काही नाही. गावातल्या बर्‍याचजणांचा हाच धंदा बरं का. मग यातून सुटका झाली की येतो आम्हाला फोन.
"धन्‍या, हत्‍ती घुसले रे बागेत. वाट लावली रे सगळ्याची."
"अहो, पण तुमची बागायती कुठे आहे? हल्लीच विकून मोकळे झालात ना."
"अरे, माझ्या गावात हत्‍ती आलेत. घरापाठीमागल्यांच्या बागांची नासधूस केली त्यांनी. मग काय ते बघायला जायला नको मला? मी आता नाय गेलो आणि उद्‍या माझ्या घरात घुसले मग काय करू मी? लोक म्हणतील, ’एकलाच होता. हत्‍तीनं आदळून टाकला असेल. बघायचं काय त्यात? आमच्या बागात घुसले तेवा नाय आला काय?’ तुज्यासारखं नाय रे जमायचं आमाला. तुमी काय नोकरदार माणसं... तुमच्या धंद्याचं नुसकान झाल्यार कळणार ते. तोपर्यंत..."
"हो, हो. बरोबर आहे तुमचं. बोला पुढे."
” अरे हो, सांगायचं हे होतं पेपरात फोटो आलाय."
"कुणाचा? हत्‍तींचा?"
"नाही रे बाबा," आता नानूकाका वैतागलेच. "हत्‍तींचा फोटो कसा काढणार? ते काय रमत-डुलत येतायत काय कर्नाटकातनं? आणि फोटो काढायला दिसायला तर हवे ना? आणि दिसले तरी हिंमत आहे का कुणात त्यांच्यासमोर जाऊन फोटो काढण्याची? सोंडेन ऊचलून फेकून देतील. तुजंपण ना कायतरीच आपलं. हां, तर मी काय बोलत होतो... फोटो."
"अरे व्वा, तुमचा फोटो आलाय तर पेपरात. नानूशेट पेपरात दिसणार तर हत्‍तीला पिटाळून लावताना."
"‍अरे हट रे. ह्त्‍ती गेले रे मोडून तोडून. आमी आपले बघायला गेलो. सोबत पत्रकार पण होते. TVर दाखवणार बोलले. हे अशे ठशे त्यांच्या येद्‍द्‍या खांबासारख्या पायांचे. येद्‍दे मोठे शेणाचे थाफे. ते बघून मग आमी एकेक जण मोडक्या केळीपाशी राहिलो उभे. आणि काय सांगू. पाठनं आला जगल्याचा मारका रेडा. असा ढोसा दिला..."
"कुणाला? तुम्हाला? तुम्ही ठीक तर आहात...?"
"अरे, आदी माजं ऐक रे सगळं. मग विचार काय ते. हां, तर रेडा आला आणि दिला ढकलून त्या पत्रकाराक. मग काय? आमी आपले हय-थय पळालो म्हणून वाचलो रे बाबा. आता रेड्यापुढे ही दशा तर हत्‍तीपुढे काय चलणार आमचा? बघ त्या मार लागलेल्या पत्रकाराचा फोटो आलाय पेपरात. त्याच्या बाजूला मी उभा आहे. ही..ही..ही..ही."
हे तर सांगितलं मी नानूकाकांच्या गावी आलेल्या पहिल्या पाहुण्याबद्‍दल. अजून दुसरा पाहुणा पण आला होता. तोही चक्‍क नानूकाकांच्या घरी. पण त्याबद्‍दल नंतर सांगेनच. गोष्ट अजून संपली नाही बरं का.
To be continued...

Saturday, November 14, 2009

बालदिन सेलिब्रेशन

      आज १४ नोव्हेंबर म्हणजे चा़चा नेहरूंचा जन्‍मदिन आपल्या देशाचा बालदिन. बालदिनाबद्‍दलची जागरुकता सगळीकडे होत असल्याचं पाहून खूप बरं वाटलं. आजचा दिवस म्हणजे मुलांचा दिवस. आज मुलांना बरीच गिफ्ट्स मिळतील, त्यांच्यासाठी खास कार्यक्रमही असतील. सगळीकडे कसं मज्‍जाच मज्‍जा. काश! आमच्यावेळी पण असं काही असतं. मी शाळेत असतानाचा बालदिन फार बोअरिंग असायचा. तेव्हा काही असं बालदिनाचं सेलिब्रेशन वगैरे नसायचं. आमचे गुरूजी वर्गात यायचे. मग चालू व्हायचं, ’मुलांनो, तुम्हाला माहितेय का आज काय आहे ते?’ मग क्षणाचाही विलंब न करता आमच्यापैकी एक कुणीतरी ओरडायचं, ’चाचा नेहरूंचा जन्‍मदिवस!!’. अगदी जोशात. कारण आदल्या दिवशी सगळ्यांना सांगितलं जायचं, ’उद्या भाषण करायचं आहे. काय आहे उद्या सांगा पाहू?’ बराच वेळ कुणीही बोलायचं नाही. पण डोकं खाजवल्यासारखं उगाच करून दाखवायचो. मग काय गुरूजीच सांगायचे काय आहे ते. पहिली ते पाचवीपर्यंत आम्हा सर्वांना एकच माहीत होतं, बालदिन म्हणजे चाचा नेहरूंचा वाढदिवस पण तो कधी असतो हेच नेमकं आठवायचं नाही. त्यासोबतच गांधीजी म्हणजे २ ऑक्‍टोबर आणि १ ऑगस्ट म्हणजे लोकमान्‍य टिळक एवढंच लक्षात राहायचं. पण जयंती की पुण्यतिथी तेच नाही आठवायचं. हा पण अशा दिवशी भाषणबाजी केल्याचं थोडंफार आठवतंय.
प्राथमिक शाळेत असताना बहुतेकदा नेहरू, गांधीजी आणि टिळकांच्या ज‍न्‍मदिन व पुण्यतिथीदिनी भाषण करण्याची सक्‍ती घरातून व्हायची. या भाषणांचं पाठांतर आमच्याकडून घरीच करून घेतलं जायचं. दुसर्‍या दिवशी सकाळी लवकर शाळेत जमून भाषण(बाजी) देण्याचा कार्यक्रम व्हायचा. जेव्हा माझा नंबर यायचा तेव्हा मी बाचकत बाचकत स्टेजवर पोहोचायचे. मग अगदी विद्यार्थी स्टाइलमध्ये चालू व्हायचं... ’माननीय अमुक-तमुक (म्हणजे प्रमुख पाहुणे बरं का), आदरणीय गुरजनवर्ग आणि माझ्या विद्यार्थी मित्रहो, आज --चा जन्मदिन...’.  मग सुरू. अशा प्रकारे कुणाचं लडबडत, तर कुणाचं धापा टाकत. यात सगळ्यांचं एकच वैशिष्ट्‍य बरं का, ते आपलं नेहमीचं "अं...अं...". भाषणबाजीचा डामडौल सांभाळताना आमचा जीव मेटाकुटीस याय़चा. असली भाषणं करताना माझा नेहमी गोंधळ उडायचा. एकदा तर मी गांधीजींच्या भाषणाला टिळाकांचं नाव घेऊन हशाच पिकला हॉलमध्ये. मला काय झालं ते कळालंच नाही. गुरूजींनी मात्र ’तु पुढे बोल म्हणत’ चालू राहू दे असं सुचवलं. नक्की काय घडलं हे मला भाषण झाल्यावर कळालं. नशीब्‍ब!! तेव्हाच कळालं असतं तर मात्र मी पुढचं बोलूच शकले नसते. गुरूजींचं हे presence of mind कळून चुकल्यानंतर वाटलं गुरूजी खरोखरच हुशार असावेत. (त्या वेळी presence of mind नाही कळायचं पण आता त्याचा मराठी समानार्थी शब्द आठवत नाही.)
आमच्यावरची भाषणसक्‍ती संपली की मग महाकंटाळा आणणारा प्रसंग आ वासून आमची वाट बघायचा. अरे देवा! पुन्हा भाषणबाजी!!! आधी प्रमुख पाहुणे, मग मुख्याध्यापक, मग सर्व वर्गशिक्षक. प्रमुख पाहुण्यांनी भाषणाला सुरवात करण्याअगोदर आमचे गुरूजी उठून म्हणायचे, ’आता आपल्या गावातील श्री. अमुक अमुक आपल्याला पंडीत नेहरूंबद्‍दल चार शब्द सांगू इच्छितात...’. तरी बरं वर्गशिक्षक संख्येने कमी होते. दोन वर्ग एकाच शिक्षकाच्या हातात असल्याने शिक्षकांची भाषणावळी थोडी कमी लांब व्हायची. या सर्व भाषणात आमच्या शाळेचे मुख्याध्यापक खूप छान बोलायचे. त्यांच्या भाषणातला प्रसंग ते बोलत असताना अगदी डोळ्यांसमोर उभा होत असे. स्टेजवर पूजलेला नेहरुंचा फोटो मुख्याध्यापक गुरूजींच्या तोंडून आमच्याशी बोलत असे. त्यांच्या या अशा भाषणांमुळेच आम्ही गांधीजी, लो. टिळक, नेहरू यांना फोटोपलीकडे ओळ्खू शकलो. आमच्या मनात या थोर पुरूषांबद्‍दल आदरभाव निर्माण झाला. आणि मग पुढे वाटू लागलं ’म्हणूनच अमुक अमुक गुरूजी आमचे मुख्याध्यापक आहेत.(कारण ते भाषण छान देतात)’.
आम्हा सर्व मुलांची भाषणं अर्ध्या पाऊण तासात, आणि एकट्या प्रमुख पाहुण्याचं भाषण तासभर आपलं चालतच राहायचं. आम्ही खाली बसलेलो. कुणी पेंगायचं. कुणी कुणाला चिमटे काढायचं, मग ते हळूच ’आंऊ’ करायचं, कुणाचातरी चॉकलेटचा कागद उघण्याचा आवाज येई. मग सगळे तिकडे वळून बघत. कुणी कुठल्यातरी कागदाच्या चिटोर्‍याने इकडे तिकडे चिट्‍ठी सरकवायचं. त्यात लिहिलेलं असायचं.. ’आज मी चिंचा आणल्यात, तुला नाही देणार’, ’कालचा अभ्यास केला का?’, ’दुपारी जेवणाच्या सुट्टीत गोळा खायला जाऊ’, वगैरे वगैरे. पण या सर्वाचा त्या प्रमुख पाहुण्यांवर काहीही परिणाम व्हायचा नाही. पुढच्या ओळीतली थोडीफार मुलं ऐकतात यातच ते समाधानी होते. मांडी घालून बसल्यामुळे पाय इतके आखडायचे की सोडावेसे वाटायचं. पण एवढ्या सगळ्या मंडळीसमोर ’ते’ करण्याचं धाडस कुणातच नसे. माझ्या पायात तर मुंग्याच यायच्या. उठायलाच नाही जमायचं. त्यामुळे ’देव करो आणि माझा भाषणात तिसरापण नंबर यायला नको’ अशी याचना मी मनातल्या मनात करे. सुरवातीला ताठ बसलेली मुलं स्टेजवरील मंडळींची भाषणं सुरू होताच हळू हळू वाकायला लागायची. आणि मुख्याध्यापकांच्या भाषणाला खडबडून जागी व्हायची. ते बोलायचेच तसे. एकेकाला नावानिशी जागं करायचे. आमचे मुख्याध्यापक भाषणाला उठले की जाग्या असलेल्या मुलांनी पेंगणार्‍यांना उठवायची ड्यूटी चालू व्हायची. जो कुणी नाही उठायचा तो मात्र मुख्याध्यापकांचा शिकार व्हायचा. कधीतरी ते भाषणातून हसवतही. त्यामुळेही कुणी झोपल्यास उठून जायचं. हेच काय ते अख्‍ख्या समारंभात refreshing.
अशा या बालदिनाच्या दिवशी आम्हा बालकांसाठी कुणीच काही करत नसे. त्यामुळे हे राष्ट्रीय दिन मनात कोरले गेले ते फक्‍त भाषणबाजीमुळेच. त्यातल्या त्यात १५ ऑगस्ट व २६ जानेवारी इतरांपेक्षा वेगळे होते. कारण त्या दिवशी चॉकलेट मिळायचं. दिवस भराभर निघून गेले. बालदिनाचाही विसर पडला. पं. नेहरू कळायला मात्र बराच उशीर लागला. आज पुन्हा refresh झाल्यासारखं वाटतंय.
जय हिंद! जय भारत!!

Friday, November 13, 2009

कूलवधू बनली C. I. D.

स्थळ- बहुतेक मराठी मंडळींचा TV Room.
काळ- रविवार सोडून सगळे वार.
वेळ- घरातल्या घडयाळात बरोबर आठ वाजायला ५-१० मिनिटे बाकी असताना, फार फार तर बरोब्बर      आठ. पण त्याच्या पुढे एक मिनिटही नाही.
घटना- मराठी महिलावर्ग घडयाळातल्या सेकंद काटाच्या तालाप्रमाणे उडया मारत किचनमध्ये असल्यास तिथून, फोनवर बोलणं चालू असल्यास ते बंद पाडून येऊन पोहोचतात त्या TV समोर. जर तो बंद असेल तर त्याला चालू केले जाते आणि चालू असल्यास त्या मराठी चॅनलवर येण्याचा आग्रह नव्हे आदेशच दिला जातो.
पुढे काय? आता काय म्हणून मला काय विचारता पुढचं ते तुम्हाला ठाऊक असेलच. तरी पण सांगते एक शेणई वाजते. माफ करा, शहनाई, नाही नाही चुकलंच, सनई वाजते (थोडआसा ’हिंदा’ळल्याचा परिणाम). मग गाऊ लागते ती वैशाली भैस-नेमाडे. परत चुकलं. पुन्हा माफ करा वैशाली भैसने-माडे... ’एक नदी सारखी वाहते मी जणू...’ आणि मग सीरिअल वाहायला लागते, I mean चालू होते. हो, हो, अगदी बरोबर. तीच ती अगोदर ती कूलवधू होणार म्हणत होते, नंतर अथक प्रयत्‍नांनी (त्यांच्या आणि आमच्याही) नववधू बनली आणि भविष्यात घर जोडणीचं पारंपारिक काम हाती घेणार आहे असं दिसतंय. सोबत तिचा तो घरबांधणीचं काम करणारा पतिराज आहेच की. त्याचीही मदत होईलच की या महाण कार्यात. तर अशी ही वधूची कहाणी जिला अजून कुळ काही लाभत नाही आणि हे पाहण्यात बर्‍याच श्रीमती आपला वेळ व्यतीत करतात.
’अरे देवा, आता कसं होईल?’, ’तो येणार की नाही?’, ’लग्‍न होणार की नाही?’ असे अनेक प्रश्‍न आमच्या घरातील तसेच तुमच्याही घरातील श्रीमतींच्या मनातून ओठांवर येऊन ते च्युइंगम चघळावे तसे या सारखं चघळत असतात. असे प्रश्‍न प्रत्येक एपिसोडमध्ये लटकत असतात ज्यांची उत्‍तरे काही दिवसांपूर्वी अगदी ते एपिसोड पूर्ण होईपर्यंत त्या मालिकेच्या निर्माता आणि लेखकालाही माहीत नसतात.
अशा कठीण समयी मी TV हॉलमध्ये असूनही त्याच्याकडे पाहण्याचे टाळते (पहा, केवढे हे धारिष्ट्य!). आणि मग कुठलंतरी मासिक वा सकाळचा पेपर पुन्हा वाचण्यात माझा time (waste) pass करते. बरं त्या वेळी फोन करावा कुणाला तर तेही मान्य नसते (तसेच मोबाईलही मिस्डकॉल देण्यापुरताच बाळगला जातो). अशा या परिस्थितीत त्याच ’त्या’ मघाच्या प्रश्‍नांचा विनाकारण माझ्यावर भडिमार सुरू होतो. तो मारा चुकवण्यासाठी अशीच काहीतरी उत्‍तरं माझ्या तोंडू बाहेर पडतात हो. तई उत्‍तरं चुकलीच की ’तसं झालंच नाही बघ..’ आणि योगायोगाने बरोबर आली तर ’अरे हो, बरोब्‍बर बोललीस तू. तसंच होतंय बघ..’ असं ऐकवलं जातं. म्हणजे उत्‍तर काहीही द्या, बघण्याचा सल्ला सोबत प्रत्युत्‍तरादाखल दिला जातोच.
ज्यावेळी मी दिलेली उत्‍तरे बरोबर येतात ना, त्यावेळची गंमत काही औरच असते. त्यावेळी हॉलमधील श्रीमतींचा (यात माझ्या प. पू. मातोश्री, आत्या, वहिनी, काकू आणि माझ्या मोठ्या विवाहित भगिनी येतात.) माझ्या तर्कबुद्‍धीविषयी असलेला विश्‍वास द्विगुणित होतो. एवढा आनंद त्यांना माझे आतापर्यंतचे परीक्षेचे रिझल्ट्स पाहूनही कदाचित झाला नसावा. आपल्याला काय? एवढंच तर हवं असतं. कुणीतरी आपल्याला कशाच्याबाबतीत तरी विचारतं हेच खुप नाही का? (नाहीतरी Engineersना आजकाल कुणीही विचारत नाही.) मी यातच समाधानी आहे बुवा.
याहूनही एक वेगळा अनुभव मिळतो तो या श्रीमतींच्या चेहर्‍यावरील भाव-भावनांचे निरीक्षण करण्याचा. time pass करायचा असेल तर या मालिका बघण्यापेक्षा त्या बघणार्‍यांना बघून खूप होऊ शकतो. त्यासोबतच जर त्यांच्या आवडत्या नायक-नायिकांची थट्टा केली तर या श्रीमतींची बोलणार्‍याला आवरायचं की TVकडे पाहायचं यात त्रेधातिरपट उडून जाते. इतकं यांचं लक्ष त्या TVवर केंद्रित झालेलं असतं की स्वयंपाक करतानादेखील मीठ भाजीत टाकलं की नाही आठवतच नाही. मग काय? त्या दिवशी जेवणातली भाजी खारट नाहीतर अळणी.. ही सीरिअल पाहण्यातली एकाग्रता स्वयंपाकात वापरली तर रोज मिष्टान्न मुखी पडेल हो आमच्या. त्याच ’त्या’ नववधूचा सुखी संसार आमच्या घरातल्या जेवणाला मिष्टान्‍न होण्यापासून परावृत्‍त करतो. एवढंच नव्हे तर घरातील इतर मंडळींना आपल्या भूकेला व जेवणाच्या वेळेला पुढे ढकलावं लागतं. अशा वेळी महत्‍त्व येतं ते सारखं सारखं तापवून ठेवलेल्या फ्रीजमधल्या शीळ्या अन्‍नाला. कारण गत्यंतर नसतो.
अशा या कुलीन वधूचा आणखी एक विक्रम. ग्रुप फोटो व्यवस्थित काढण्याचे जे काम बर्‍याचदा जमता जमत नाही तेच काम या सुप्रसिद्‍ध मालिका चुटकीसरशी करू शकतात. ”अहो काका तुम्ही इकडे बघा, माझ्याकडे. काकू तुम्ही जरा मान खाली घ्या पाहू नाहीतर काकांपेक्षा उंच दिसाल. ताई तुम्ही जरा बाजूला सरका. जास्तपण नको नाहीतर फोटोमधनच बाजूला व्हाल. याला इथेच राहू दे, तुम्ही हलू नका. तुम्ही हललात तर तो नाही दिसायचा. अहो, मी सांगतो ते ऐका जरा.. ओके.. ready??” हुश्श!! एवढ्या सगळ्या सूचना मिळूनही काका एका डोळ्याने चकणे वाटतात, काकू झोपताहेत असं वाटतं, तर कुणी तारे मोजल्यासारखं वर पाहतो, ताईच्या हास्यछ्टा ओढूनताणून खुलतात, कुणाच्या नाकासमोरची माशीच हलत नाही, कुणाचे तरी एरव्ही कडक इस्त्री केलेले कपडे नेमके चुरगळतात आणि सगळ्यात महत्‍त्वाची गोष्ट म्हणजे श्रीमतींच्या साडीचा काठच परततो. अशा एक ना अनेक बारीक सारीक चुका होतच राहतात आणि सगळ्यांना फोटोजनिक बनवेपर्यंत बराच वेळ निघून जातो. या सगळ्या रणधुमाळीपेक्षा जर त्या TVमधल्या विक्रमादित्यला कॅमेरा दिला तर हेच काम मिनिटभरात होईलच बघा. एवढी जादू त्याच्यात आहे बरं का.
या यांच्या ’वधू-वर’ मालिकेमुळे मला बर्‍याचदा अत्यंत उत्कंठावर्धक, अप्रतिम आणि अर्थात intelligent अशा C.I.D.ला मुकावं लागायचं. काय सांगू तुम्हाला काय सीरिअल आहे C.I.D..!! व्‍वा आणि व्वा. या पलीकडचे शब्द मला आठवत नाहीत. तो ACP, त्याचे साथीदार सारं काही बेमिसाल. ती सीरिअल पाहताना अस्‍सं वाटतं.. त्यांच्यासोबत आपणही शोधमोहिमेत उतरलो की काय. आणि एवढं सगळं अगदी धमाल चालू असताना तुमची ती नववधू, तिच्या आया-बहिणी घुसल्या तर काय होईल? रंगाचा बेरंग होईल ना? अहो, तेच तर होत असतं हल्‍ली माझ्याबाबतीत. कल्पना करा, तुम्ही बटरस्कॉच किंवा चॉकलेट आइसक्रीमचा कप हातात घेऊन चमच्याने त्याच्याशी लडिवाळपणाने खाण्याचा मनमुराद आनंद लुटता आहात. आणि अचानक त्या आइसक्रीमचा फ्लेव्हर उडून गेल्यावर ते जसं लागतं ना, अगदी तस्‍संच ही कुलीन, शालीन नववधू C.I.D. चा अर्धा तास कापून त्याचा फ्लेव्हरच काढून टाकते. त्याला अगदी बेचव करते. आणि मग त्या वितळणार्‍या गोळ्यावर काम चालवावं लागतं.
अशी ही कूलवधू घरच्यांच्या डोक्‍यात घर करून बसलेली. पण मीही काही गप्प बसणार्‍यातली थोडीच आहे? या सूनेला घरातून हाकलून देण्याचा पवित्रा मी पण घेतला आहे. तुम्ही मनातल्या मनात म्हणत असाल या ’कूलवधू’वर सूड उगवण्याच्या प्रयत्‍नात मी व्हॅम्प का बनलीय? कारण तुमच्यांपैकीही कुणीतरी तिचे फॅन असेलच ना? तुम्ही म्हणता व्हॅम्प तर आहेच मी. आणि व्हॅम्प नेहमी कट शिजवतच असते नाही का? आणि या वेळी मी एक कट शिजवलाच आहे, 4 stage plan.  कोणता? सांगते.
या कटाचा पहिला टप्‍पा तो म्हणजे घरातील श्रीमतींना भासवलं की मी तुमच्याच सीरीयलची प्रेक्षक आहे. असा आव आणून TVचा रिमोट माझ्या प. पू. मातोश्रीकडून माझ्या हातात आणला. दुसर्‍या टप्प्यात मातोश्रींच्या या आवडत्या कूलवधूने जाहिरातींना वेळ देताच लगेच चॅनल बदललं. या टप्‍प्यात दोन-चार वेळा बोलणी खावी लागली. पण यावेळी मी कूलवधूची वर्तवलेली भविष्यवाणी मदतीस आली. मालिकेबाबतच्या माझ्या तर्कांवर त्यांचा विश्‍वास बसल्यामुळे ’तुमची वधू परत येईल तेव्हा तिला परत भेटूच, तोपर्यंत हे बघा..’ या बतावणीवर त्यांचा विश्‍वास बसला. तिसरा टप्पा लागलीच अंमलात आणला. भराभर C.I.D.ची माहिती देण्यास सुरवात केली. शिवाजी साटमनी ACPचा रोल करून मेहेरबानी केलीच. ’अरे हा बघ इथे??’ असे म्हणत श्रीमतींनी इंटरेस्ट घेतला.मग मी चोर कोण पोलिस को याची ढोबळ कल्‍पना दिली. असा हा रात्री आठनंतरचा दिनक्रम मी रोज करण्यात यशस्वी झाले. आजकाल तर C.I.D. ब्रेक देईपर्यंत ’कूलवधू’ आठवतच नाही. आठवण येते तेव्हा लगेच चॅनल बदलण्याची तत्परता मी दाखवते. नववधूचं काय घडलं असावं याचे थोडेफार तुक्‍के मारण्याची करामत करते. मग पुन्हा तेच इकडे जाहिरात की तिकडे उडी आणि तिकडे जाहिरात की इकडे उडी. पण या उडाउडीत C.I.D.  फार बेचव लागतं. पण माझा ठाम विश्‍वास आहे मी कटाच्या शेवटच्या टप्प्यात यशस्वी होईनच. ’मालिका थोडी रटाळ आहे’ वगैरे म्हणत थोडी विषपेरणी करायला सुरवात केलीच आहे. विष चढायला थोडा वेळ लागेल म्हणा.
मग बनली की नाही आमच्या घरातली कूलवधू C.I.D. ?  तुम्हालाही हा प्रयत्‍न करून बघायला काहीच हरकत नाही. फक्‍त घरातल्या श्रीमतींपर्यंत ही बातमी पोहोचणार नाही हे ध्यानात ठेवा. यशापयश आल्यास सांगायला विसरु नका.

Monday, November 2, 2009

कुणी मुख्यमंत्री घ्या, कुणी उपमुख्यमंत्री घ्या...

        आतापर्यंत राज्यात विधानसभेच्या निवडणुका होऊन सत्‍तास्थापनेची वेळही आली. पण बहुमत मिळालेल्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा खातेवाटपाचा पेच मात्र सुटता सुटत नाही आहे. यावर बातमी देताना एका वृत्‍तपत्राने म्हटले, ’रविवारही ठरला वांझोटा’. ही बातमी वाचली आणि डोक्यात विचारचक्र गरागरा फिरू लागले.
हा रविवार का बरं वांझोटा? त्या दिवशी (म्हणजे रविवारी) आघाडीच्या चर्चेतून काहीच निष्प‍न्‍न नाही झाले म्हणून? त्या दिवशी सत्‍तास्थापनेच्या दृष्टीने काही घडले नाही म्हणून का रविवार वांझोटा? मी म्हणते कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी गर्भार असताना रविवारला वांझोटा म्हणत का बरं दोष द्यायचा? निवडणुकीचा निकाल लागून १०-१२ दिवस उलटून गेले म्हणजेच आघाडी १०-१२ दिवसांची गरोदर आहेच म्हणा की!
हे इतके दिवस म्हणजे सत्‍तास्थापनेस बराच विलंब असं सगळीकडून म्हटलं जात आहे. पण आघाडीच्या बाजूने स्पष्ट बहुमताचा कौल देणा़र्‍या सुज्ञ मतदारहो, जरा हा विचार करा, केवळ १०-१२ दिवसांची गरोदर असलेल्या (कॉंग्रेस-राष्ट्रवादी) आघाडी मातेला जवळपास ७०-८० (७०-८० ही मंत्रिमर्यादा जम्बो मंत्रिमंडळाचे आजकाल फॅड असल्यामुळे गृहीत धरण्यात आलेली आहे.) मंत्र्यांना जन्‍म द्यायचा म्हणजे ही गंमत थोडीच आहे? आजपर्यंत पृथ्वीवरच्या कुठल्या प्राणीमातेने इतक्या जास्त मुलांना इतक्या कमी वेळात जन्म दिला असेल? मनुष्यमातेला तर एका अपत्याला जन्‍म देण्यासाठी ९ महिने गर्भ वाढवावा लागतो. मग इकडे आघाडी मातेला ७०-८० मंत्रिमहोदयांना जन्माला घालायचं म्हणजे किती काळ लागेल बुवा...? विचार आणि आकडेमोड न केलेलीच बरी. त्यात पुन्हा जुळं-तिळं धरायचं म्हणजे गणिती किचकट वाढते की.
ते काहीही असो, ज्याप्रमाणे आपण निवडणुकीत आघाडीवर विश्‍वास दाखवला त्याचप्रमाणे आताही या मातेला शुभाशिर्वाद देऊ आणि जसजसे मंत्री जन्‍माला येतील तसतसे त्यांचे स्वागत करू. फक्‍त स्वागतच बरं का. बारशाचे टेन्शन आपण नाही घ्यायचं. ते थाटामाटात करायला कार्यकर्ते आहेत की!