Saturday, November 14, 2009

बालदिन सेलिब्रेशन

      आज १४ नोव्हेंबर म्हणजे चा़चा नेहरूंचा जन्‍मदिन आपल्या देशाचा बालदिन. बालदिनाबद्‍दलची जागरुकता सगळीकडे होत असल्याचं पाहून खूप बरं वाटलं. आजचा दिवस म्हणजे मुलांचा दिवस. आज मुलांना बरीच गिफ्ट्स मिळतील, त्यांच्यासाठी खास कार्यक्रमही असतील. सगळीकडे कसं मज्‍जाच मज्‍जा. काश! आमच्यावेळी पण असं काही असतं. मी शाळेत असतानाचा बालदिन फार बोअरिंग असायचा. तेव्हा काही असं बालदिनाचं सेलिब्रेशन वगैरे नसायचं. आमचे गुरूजी वर्गात यायचे. मग चालू व्हायचं, ’मुलांनो, तुम्हाला माहितेय का आज काय आहे ते?’ मग क्षणाचाही विलंब न करता आमच्यापैकी एक कुणीतरी ओरडायचं, ’चाचा नेहरूंचा जन्‍मदिवस!!’. अगदी जोशात. कारण आदल्या दिवशी सगळ्यांना सांगितलं जायचं, ’उद्या भाषण करायचं आहे. काय आहे उद्या सांगा पाहू?’ बराच वेळ कुणीही बोलायचं नाही. पण डोकं खाजवल्यासारखं उगाच करून दाखवायचो. मग काय गुरूजीच सांगायचे काय आहे ते. पहिली ते पाचवीपर्यंत आम्हा सर्वांना एकच माहीत होतं, बालदिन म्हणजे चाचा नेहरूंचा वाढदिवस पण तो कधी असतो हेच नेमकं आठवायचं नाही. त्यासोबतच गांधीजी म्हणजे २ ऑक्‍टोबर आणि १ ऑगस्ट म्हणजे लोकमान्‍य टिळक एवढंच लक्षात राहायचं. पण जयंती की पुण्यतिथी तेच नाही आठवायचं. हा पण अशा दिवशी भाषणबाजी केल्याचं थोडंफार आठवतंय.
प्राथमिक शाळेत असताना बहुतेकदा नेहरू, गांधीजी आणि टिळकांच्या ज‍न्‍मदिन व पुण्यतिथीदिनी भाषण करण्याची सक्‍ती घरातून व्हायची. या भाषणांचं पाठांतर आमच्याकडून घरीच करून घेतलं जायचं. दुसर्‍या दिवशी सकाळी लवकर शाळेत जमून भाषण(बाजी) देण्याचा कार्यक्रम व्हायचा. जेव्हा माझा नंबर यायचा तेव्हा मी बाचकत बाचकत स्टेजवर पोहोचायचे. मग अगदी विद्यार्थी स्टाइलमध्ये चालू व्हायचं... ’माननीय अमुक-तमुक (म्हणजे प्रमुख पाहुणे बरं का), आदरणीय गुरजनवर्ग आणि माझ्या विद्यार्थी मित्रहो, आज --चा जन्मदिन...’.  मग सुरू. अशा प्रकारे कुणाचं लडबडत, तर कुणाचं धापा टाकत. यात सगळ्यांचं एकच वैशिष्ट्‍य बरं का, ते आपलं नेहमीचं "अं...अं...". भाषणबाजीचा डामडौल सांभाळताना आमचा जीव मेटाकुटीस याय़चा. असली भाषणं करताना माझा नेहमी गोंधळ उडायचा. एकदा तर मी गांधीजींच्या भाषणाला टिळाकांचं नाव घेऊन हशाच पिकला हॉलमध्ये. मला काय झालं ते कळालंच नाही. गुरूजींनी मात्र ’तु पुढे बोल म्हणत’ चालू राहू दे असं सुचवलं. नक्की काय घडलं हे मला भाषण झाल्यावर कळालं. नशीब्‍ब!! तेव्हाच कळालं असतं तर मात्र मी पुढचं बोलूच शकले नसते. गुरूजींचं हे presence of mind कळून चुकल्यानंतर वाटलं गुरूजी खरोखरच हुशार असावेत. (त्या वेळी presence of mind नाही कळायचं पण आता त्याचा मराठी समानार्थी शब्द आठवत नाही.)
आमच्यावरची भाषणसक्‍ती संपली की मग महाकंटाळा आणणारा प्रसंग आ वासून आमची वाट बघायचा. अरे देवा! पुन्हा भाषणबाजी!!! आधी प्रमुख पाहुणे, मग मुख्याध्यापक, मग सर्व वर्गशिक्षक. प्रमुख पाहुण्यांनी भाषणाला सुरवात करण्याअगोदर आमचे गुरूजी उठून म्हणायचे, ’आता आपल्या गावातील श्री. अमुक अमुक आपल्याला पंडीत नेहरूंबद्‍दल चार शब्द सांगू इच्छितात...’. तरी बरं वर्गशिक्षक संख्येने कमी होते. दोन वर्ग एकाच शिक्षकाच्या हातात असल्याने शिक्षकांची भाषणावळी थोडी कमी लांब व्हायची. या सर्व भाषणात आमच्या शाळेचे मुख्याध्यापक खूप छान बोलायचे. त्यांच्या भाषणातला प्रसंग ते बोलत असताना अगदी डोळ्यांसमोर उभा होत असे. स्टेजवर पूजलेला नेहरुंचा फोटो मुख्याध्यापक गुरूजींच्या तोंडून आमच्याशी बोलत असे. त्यांच्या या अशा भाषणांमुळेच आम्ही गांधीजी, लो. टिळक, नेहरू यांना फोटोपलीकडे ओळ्खू शकलो. आमच्या मनात या थोर पुरूषांबद्‍दल आदरभाव निर्माण झाला. आणि मग पुढे वाटू लागलं ’म्हणूनच अमुक अमुक गुरूजी आमचे मुख्याध्यापक आहेत.(कारण ते भाषण छान देतात)’.
आम्हा सर्व मुलांची भाषणं अर्ध्या पाऊण तासात, आणि एकट्या प्रमुख पाहुण्याचं भाषण तासभर आपलं चालतच राहायचं. आम्ही खाली बसलेलो. कुणी पेंगायचं. कुणी कुणाला चिमटे काढायचं, मग ते हळूच ’आंऊ’ करायचं, कुणाचातरी चॉकलेटचा कागद उघण्याचा आवाज येई. मग सगळे तिकडे वळून बघत. कुणी कुठल्यातरी कागदाच्या चिटोर्‍याने इकडे तिकडे चिट्‍ठी सरकवायचं. त्यात लिहिलेलं असायचं.. ’आज मी चिंचा आणल्यात, तुला नाही देणार’, ’कालचा अभ्यास केला का?’, ’दुपारी जेवणाच्या सुट्टीत गोळा खायला जाऊ’, वगैरे वगैरे. पण या सर्वाचा त्या प्रमुख पाहुण्यांवर काहीही परिणाम व्हायचा नाही. पुढच्या ओळीतली थोडीफार मुलं ऐकतात यातच ते समाधानी होते. मांडी घालून बसल्यामुळे पाय इतके आखडायचे की सोडावेसे वाटायचं. पण एवढ्या सगळ्या मंडळीसमोर ’ते’ करण्याचं धाडस कुणातच नसे. माझ्या पायात तर मुंग्याच यायच्या. उठायलाच नाही जमायचं. त्यामुळे ’देव करो आणि माझा भाषणात तिसरापण नंबर यायला नको’ अशी याचना मी मनातल्या मनात करे. सुरवातीला ताठ बसलेली मुलं स्टेजवरील मंडळींची भाषणं सुरू होताच हळू हळू वाकायला लागायची. आणि मुख्याध्यापकांच्या भाषणाला खडबडून जागी व्हायची. ते बोलायचेच तसे. एकेकाला नावानिशी जागं करायचे. आमचे मुख्याध्यापक भाषणाला उठले की जाग्या असलेल्या मुलांनी पेंगणार्‍यांना उठवायची ड्यूटी चालू व्हायची. जो कुणी नाही उठायचा तो मात्र मुख्याध्यापकांचा शिकार व्हायचा. कधीतरी ते भाषणातून हसवतही. त्यामुळेही कुणी झोपल्यास उठून जायचं. हेच काय ते अख्‍ख्या समारंभात refreshing.
अशा या बालदिनाच्या दिवशी आम्हा बालकांसाठी कुणीच काही करत नसे. त्यामुळे हे राष्ट्रीय दिन मनात कोरले गेले ते फक्‍त भाषणबाजीमुळेच. त्यातल्या त्यात १५ ऑगस्ट व २६ जानेवारी इतरांपेक्षा वेगळे होते. कारण त्या दिवशी चॉकलेट मिळायचं. दिवस भराभर निघून गेले. बालदिनाचाही विसर पडला. पं. नेहरू कळायला मात्र बराच उशीर लागला. आज पुन्हा refresh झाल्यासारखं वाटतंय.
जय हिंद! जय भारत!!

Friday, November 13, 2009

कूलवधू बनली C. I. D.

स्थळ- बहुतेक मराठी मंडळींचा TV Room.
काळ- रविवार सोडून सगळे वार.
वेळ- घरातल्या घडयाळात बरोबर आठ वाजायला ५-१० मिनिटे बाकी असताना, फार फार तर बरोब्बर      आठ. पण त्याच्या पुढे एक मिनिटही नाही.
घटना- मराठी महिलावर्ग घडयाळातल्या सेकंद काटाच्या तालाप्रमाणे उडया मारत किचनमध्ये असल्यास तिथून, फोनवर बोलणं चालू असल्यास ते बंद पाडून येऊन पोहोचतात त्या TV समोर. जर तो बंद असेल तर त्याला चालू केले जाते आणि चालू असल्यास त्या मराठी चॅनलवर येण्याचा आग्रह नव्हे आदेशच दिला जातो.
पुढे काय? आता काय म्हणून मला काय विचारता पुढचं ते तुम्हाला ठाऊक असेलच. तरी पण सांगते एक शेणई वाजते. माफ करा, शहनाई, नाही नाही चुकलंच, सनई वाजते (थोडआसा ’हिंदा’ळल्याचा परिणाम). मग गाऊ लागते ती वैशाली भैस-नेमाडे. परत चुकलं. पुन्हा माफ करा वैशाली भैसने-माडे... ’एक नदी सारखी वाहते मी जणू...’ आणि मग सीरिअल वाहायला लागते, I mean चालू होते. हो, हो, अगदी बरोबर. तीच ती अगोदर ती कूलवधू होणार म्हणत होते, नंतर अथक प्रयत्‍नांनी (त्यांच्या आणि आमच्याही) नववधू बनली आणि भविष्यात घर जोडणीचं पारंपारिक काम हाती घेणार आहे असं दिसतंय. सोबत तिचा तो घरबांधणीचं काम करणारा पतिराज आहेच की. त्याचीही मदत होईलच की या महाण कार्यात. तर अशी ही वधूची कहाणी जिला अजून कुळ काही लाभत नाही आणि हे पाहण्यात बर्‍याच श्रीमती आपला वेळ व्यतीत करतात.
’अरे देवा, आता कसं होईल?’, ’तो येणार की नाही?’, ’लग्‍न होणार की नाही?’ असे अनेक प्रश्‍न आमच्या घरातील तसेच तुमच्याही घरातील श्रीमतींच्या मनातून ओठांवर येऊन ते च्युइंगम चघळावे तसे या सारखं चघळत असतात. असे प्रश्‍न प्रत्येक एपिसोडमध्ये लटकत असतात ज्यांची उत्‍तरे काही दिवसांपूर्वी अगदी ते एपिसोड पूर्ण होईपर्यंत त्या मालिकेच्या निर्माता आणि लेखकालाही माहीत नसतात.
अशा कठीण समयी मी TV हॉलमध्ये असूनही त्याच्याकडे पाहण्याचे टाळते (पहा, केवढे हे धारिष्ट्य!). आणि मग कुठलंतरी मासिक वा सकाळचा पेपर पुन्हा वाचण्यात माझा time (waste) pass करते. बरं त्या वेळी फोन करावा कुणाला तर तेही मान्य नसते (तसेच मोबाईलही मिस्डकॉल देण्यापुरताच बाळगला जातो). अशा या परिस्थितीत त्याच ’त्या’ मघाच्या प्रश्‍नांचा विनाकारण माझ्यावर भडिमार सुरू होतो. तो मारा चुकवण्यासाठी अशीच काहीतरी उत्‍तरं माझ्या तोंडू बाहेर पडतात हो. तई उत्‍तरं चुकलीच की ’तसं झालंच नाही बघ..’ आणि योगायोगाने बरोबर आली तर ’अरे हो, बरोब्‍बर बोललीस तू. तसंच होतंय बघ..’ असं ऐकवलं जातं. म्हणजे उत्‍तर काहीही द्या, बघण्याचा सल्ला सोबत प्रत्युत्‍तरादाखल दिला जातोच.
ज्यावेळी मी दिलेली उत्‍तरे बरोबर येतात ना, त्यावेळची गंमत काही औरच असते. त्यावेळी हॉलमधील श्रीमतींचा (यात माझ्या प. पू. मातोश्री, आत्या, वहिनी, काकू आणि माझ्या मोठ्या विवाहित भगिनी येतात.) माझ्या तर्कबुद्‍धीविषयी असलेला विश्‍वास द्विगुणित होतो. एवढा आनंद त्यांना माझे आतापर्यंतचे परीक्षेचे रिझल्ट्स पाहूनही कदाचित झाला नसावा. आपल्याला काय? एवढंच तर हवं असतं. कुणीतरी आपल्याला कशाच्याबाबतीत तरी विचारतं हेच खुप नाही का? (नाहीतरी Engineersना आजकाल कुणीही विचारत नाही.) मी यातच समाधानी आहे बुवा.
याहूनही एक वेगळा अनुभव मिळतो तो या श्रीमतींच्या चेहर्‍यावरील भाव-भावनांचे निरीक्षण करण्याचा. time pass करायचा असेल तर या मालिका बघण्यापेक्षा त्या बघणार्‍यांना बघून खूप होऊ शकतो. त्यासोबतच जर त्यांच्या आवडत्या नायक-नायिकांची थट्टा केली तर या श्रीमतींची बोलणार्‍याला आवरायचं की TVकडे पाहायचं यात त्रेधातिरपट उडून जाते. इतकं यांचं लक्ष त्या TVवर केंद्रित झालेलं असतं की स्वयंपाक करतानादेखील मीठ भाजीत टाकलं की नाही आठवतच नाही. मग काय? त्या दिवशी जेवणातली भाजी खारट नाहीतर अळणी.. ही सीरिअल पाहण्यातली एकाग्रता स्वयंपाकात वापरली तर रोज मिष्टान्न मुखी पडेल हो आमच्या. त्याच ’त्या’ नववधूचा सुखी संसार आमच्या घरातल्या जेवणाला मिष्टान्‍न होण्यापासून परावृत्‍त करतो. एवढंच नव्हे तर घरातील इतर मंडळींना आपल्या भूकेला व जेवणाच्या वेळेला पुढे ढकलावं लागतं. अशा वेळी महत्‍त्व येतं ते सारखं सारखं तापवून ठेवलेल्या फ्रीजमधल्या शीळ्या अन्‍नाला. कारण गत्यंतर नसतो.
अशा या कुलीन वधूचा आणखी एक विक्रम. ग्रुप फोटो व्यवस्थित काढण्याचे जे काम बर्‍याचदा जमता जमत नाही तेच काम या सुप्रसिद्‍ध मालिका चुटकीसरशी करू शकतात. ”अहो काका तुम्ही इकडे बघा, माझ्याकडे. काकू तुम्ही जरा मान खाली घ्या पाहू नाहीतर काकांपेक्षा उंच दिसाल. ताई तुम्ही जरा बाजूला सरका. जास्तपण नको नाहीतर फोटोमधनच बाजूला व्हाल. याला इथेच राहू दे, तुम्ही हलू नका. तुम्ही हललात तर तो नाही दिसायचा. अहो, मी सांगतो ते ऐका जरा.. ओके.. ready??” हुश्श!! एवढ्या सगळ्या सूचना मिळूनही काका एका डोळ्याने चकणे वाटतात, काकू झोपताहेत असं वाटतं, तर कुणी तारे मोजल्यासारखं वर पाहतो, ताईच्या हास्यछ्टा ओढूनताणून खुलतात, कुणाच्या नाकासमोरची माशीच हलत नाही, कुणाचे तरी एरव्ही कडक इस्त्री केलेले कपडे नेमके चुरगळतात आणि सगळ्यात महत्‍त्वाची गोष्ट म्हणजे श्रीमतींच्या साडीचा काठच परततो. अशा एक ना अनेक बारीक सारीक चुका होतच राहतात आणि सगळ्यांना फोटोजनिक बनवेपर्यंत बराच वेळ निघून जातो. या सगळ्या रणधुमाळीपेक्षा जर त्या TVमधल्या विक्रमादित्यला कॅमेरा दिला तर हेच काम मिनिटभरात होईलच बघा. एवढी जादू त्याच्यात आहे बरं का.
या यांच्या ’वधू-वर’ मालिकेमुळे मला बर्‍याचदा अत्यंत उत्कंठावर्धक, अप्रतिम आणि अर्थात intelligent अशा C.I.D.ला मुकावं लागायचं. काय सांगू तुम्हाला काय सीरिअल आहे C.I.D..!! व्‍वा आणि व्वा. या पलीकडचे शब्द मला आठवत नाहीत. तो ACP, त्याचे साथीदार सारं काही बेमिसाल. ती सीरिअल पाहताना अस्‍सं वाटतं.. त्यांच्यासोबत आपणही शोधमोहिमेत उतरलो की काय. आणि एवढं सगळं अगदी धमाल चालू असताना तुमची ती नववधू, तिच्या आया-बहिणी घुसल्या तर काय होईल? रंगाचा बेरंग होईल ना? अहो, तेच तर होत असतं हल्‍ली माझ्याबाबतीत. कल्पना करा, तुम्ही बटरस्कॉच किंवा चॉकलेट आइसक्रीमचा कप हातात घेऊन चमच्याने त्याच्याशी लडिवाळपणाने खाण्याचा मनमुराद आनंद लुटता आहात. आणि अचानक त्या आइसक्रीमचा फ्लेव्हर उडून गेल्यावर ते जसं लागतं ना, अगदी तस्‍संच ही कुलीन, शालीन नववधू C.I.D. चा अर्धा तास कापून त्याचा फ्लेव्हरच काढून टाकते. त्याला अगदी बेचव करते. आणि मग त्या वितळणार्‍या गोळ्यावर काम चालवावं लागतं.
अशी ही कूलवधू घरच्यांच्या डोक्‍यात घर करून बसलेली. पण मीही काही गप्प बसणार्‍यातली थोडीच आहे? या सूनेला घरातून हाकलून देण्याचा पवित्रा मी पण घेतला आहे. तुम्ही मनातल्या मनात म्हणत असाल या ’कूलवधू’वर सूड उगवण्याच्या प्रयत्‍नात मी व्हॅम्प का बनलीय? कारण तुमच्यांपैकीही कुणीतरी तिचे फॅन असेलच ना? तुम्ही म्हणता व्हॅम्प तर आहेच मी. आणि व्हॅम्प नेहमी कट शिजवतच असते नाही का? आणि या वेळी मी एक कट शिजवलाच आहे, 4 stage plan.  कोणता? सांगते.
या कटाचा पहिला टप्‍पा तो म्हणजे घरातील श्रीमतींना भासवलं की मी तुमच्याच सीरीयलची प्रेक्षक आहे. असा आव आणून TVचा रिमोट माझ्या प. पू. मातोश्रीकडून माझ्या हातात आणला. दुसर्‍या टप्प्यात मातोश्रींच्या या आवडत्या कूलवधूने जाहिरातींना वेळ देताच लगेच चॅनल बदललं. या टप्‍प्यात दोन-चार वेळा बोलणी खावी लागली. पण यावेळी मी कूलवधूची वर्तवलेली भविष्यवाणी मदतीस आली. मालिकेबाबतच्या माझ्या तर्कांवर त्यांचा विश्‍वास बसल्यामुळे ’तुमची वधू परत येईल तेव्हा तिला परत भेटूच, तोपर्यंत हे बघा..’ या बतावणीवर त्यांचा विश्‍वास बसला. तिसरा टप्पा लागलीच अंमलात आणला. भराभर C.I.D.ची माहिती देण्यास सुरवात केली. शिवाजी साटमनी ACPचा रोल करून मेहेरबानी केलीच. ’अरे हा बघ इथे??’ असे म्हणत श्रीमतींनी इंटरेस्ट घेतला.मग मी चोर कोण पोलिस को याची ढोबळ कल्‍पना दिली. असा हा रात्री आठनंतरचा दिनक्रम मी रोज करण्यात यशस्वी झाले. आजकाल तर C.I.D. ब्रेक देईपर्यंत ’कूलवधू’ आठवतच नाही. आठवण येते तेव्हा लगेच चॅनल बदलण्याची तत्परता मी दाखवते. नववधूचं काय घडलं असावं याचे थोडेफार तुक्‍के मारण्याची करामत करते. मग पुन्हा तेच इकडे जाहिरात की तिकडे उडी आणि तिकडे जाहिरात की इकडे उडी. पण या उडाउडीत C.I.D.  फार बेचव लागतं. पण माझा ठाम विश्‍वास आहे मी कटाच्या शेवटच्या टप्प्यात यशस्वी होईनच. ’मालिका थोडी रटाळ आहे’ वगैरे म्हणत थोडी विषपेरणी करायला सुरवात केलीच आहे. विष चढायला थोडा वेळ लागेल म्हणा.
मग बनली की नाही आमच्या घरातली कूलवधू C.I.D. ?  तुम्हालाही हा प्रयत्‍न करून बघायला काहीच हरकत नाही. फक्‍त घरातल्या श्रीमतींपर्यंत ही बातमी पोहोचणार नाही हे ध्यानात ठेवा. यशापयश आल्यास सांगायला विसरु नका.