Wednesday, November 18, 2009

अतिथी देवो भव

         आपली भारतीय संस्कृती फार प्राचीन. हीच संस्कृती आपल्याला सांगते- अतिथी देवो भव. म्हणजे घरी येणारा प्रत्येक पाहुणा हा देव असतो. त्याचं देवासमान आदरातिथ्य करावं. पण हल्‍लीचा जमाना असा आलाय ना की ’आलेला पाहुणा हा देव असेलच कशावरुन?’ याची शहानिशा केल्याशिवाय आदरातिथ्य सोडाच पण घरात पाऊलपण टाकू द्यायचं नाही असं आमचं धोरण असतं. आता आजकालच्या वातावरणात हे अयोग्य आहे असं मी म्हणणार नाही बरं का. या ’अतिथीदेवो’ची परंपरा जर पहिल्यांदा कुणी झुगारली असेल तर त्या बिल्डिंगवाल्या मंडळींनी. नुसतं ’पाहुणा’ म्हटलं (’येणार’ म्हणायच्या आतच) की यांना वाटतं ’नको रे बाबा!!’. अगदी दारावरची घंटी वाजली तरी यांना छातीत धडकी भरते. नेहमीच्या वेळची बेल नाही म्हणजे ’कोण?’ या चिंतेत इतके बुडून जातात की दरवाजाच उघडत नाहीत. अतिथी या शब्दाचा अर्थ यांच्यासाठी भयानक असं काहीतरी हा असतो.
         यापेक्षा अगदी उलटं ते म्हणजे खेडेगावातलं. तिथल्या घरांना ही असली भीती नसते. आमच्या कोकणातली कौलारु घरं (आजकाल अशा घरांची संख्याही कमी झाली हे दुर्दैव!) तर ’अतिथी’ला नेहमीच सामोरी जात असतात (कारण इथे लिहून घेतलेले पत्‍तेही इच्छित घर शोधून देऊ शकतीलच असं नाही). शेणाने सारवलेली, मातीच्या भीतींनी उभारलेली काही भव्यदिव्य घरं तर ’येवा, घर आपलाच आसा’ अशा तोर्‍यात उभी असतात. अतिथी हा शब्द त्यांना हेच सुचवतो कुणीही, कधीही, कसंही यावं. आल्या-गेल्या प्रत्येकाचं स्वागत ही घरं अगदी तटस्थपणे करतात. मग काय कुणीही येतं. किड्या-मुंग्यांपासून ते दिवडापर्यंत (दिवड = कोकणातला धामण), कुत्र्या-मांजरापासून ते बिबट्यापर्यंत, आणि वादळवार्‍यापासून ते पूरापर्यंत, कुणीही येतं, कितीही दिवस राहतं आणि कंटाळा आला की निघून जातं. अशा या प्राचीन अशा घर कम सजीववस्तू संग्रहालय वास्तूत कधी कधी अजून एक सजीव असतो, तो म्हणजे मनुष्यप्राणी. हा पण त्यांच्यासोबत कसलीही कुरबुर न करता राहत असतो. सोबती असते ते त्याचे वृधत्‍व. गाव-गप्‍पा, विडी व पान या काय त्या चैनीच्या वस्तू असतात दिवस घालवायला. शेजार-पाजार असेल तर दोनवेळचं अन्‍न पडत तोंडात. असं हे आयुष्य समाधानानं सरत असतं. त्यात सुखाचा लवलेश नसतो. खरं तर सुख ही भावना फार अगोदर अनुभवलेली असते. आता शिल्‍लक असतं ते फक्‍त समाधान, फार पूर्वी अनुभवलेल्या सुखाचं.
कोकणातल्या अशा अनेक एकाकी घरांपैकी एक घर आमच्या ओळखीचं आहे. नानूकाका हे त्या घरात राहणारे एकमेव मनुष्यप्राणी. माझ्या आईचे चुलतमामा असलेले नानूकाका हे दोडामार्गातले. हे तेच ते  सिंधुदूर्गातील दोडामार्ग जिथे कर्नाटकातल्या हत्‍तींनी घुसकखोरी करून ते जंगल कर्नाटकात असल्याचा दावा केला होता. दोडामार्गातल्या जंगलानजीक शेजारधर्म म्हणून राहणार्‍या अनेक घरांपैकी नानूकाकांचं घर एक. दहा खोल्यांच्या या घरात नानूकाका प्रत्यक्ष फक्‍त तीन खोल्यांचा वापर करतात. बाकीच्या खोल्या दिवड, वटवाघळं, इत्यादींच्या नावे केलेल्या. दोडामार्गातल्या भारनियमनामुळे नानूकाकांचं घर काही काळ शांत राहतं. उंदीर-दिवडाची लुकाछुपी तेवढी चालू असते म्हणा. पण एकदा का वीजेने घरात संचार केला की मग मात्र नानूंचा लाडका TV बडबड केल्यावाचून राहत नाही. त्याची वटवट दिवसभर चालू राहते. आणि आमचे नानूकाका पण ना, TVचे भयंकर वेडे. त्याहूनही भयंकर वेड ते बातम्यांचं. ’आज तक’वरील ’मौत का कुआ’ पासून ठाकर्‍यांचं ’मराठी युद्‍ध’ या सर्वात त्यांचा रस फार. नानूंची ही रसबाजी आमच्यापर्यंतही नेहमी पोहोचते. माझ्या वडलांची आणि नानूकाकांची आवड एकच, बातम्या चघळण्याची. अर्थात वडीलांना ऑफिसमुळे बातम्या फार वेळ नाही चघळता येत. पण निवृत्‍त झालेल्या नानूकाकांचं मात्र रवंथ चालू असतंच.
"अरे, तुला माहितेय का धन्या, वीज कोसळली वीज..."
"कुणावर?"
"कुठे आहेस कुठे तू?"
"कुठे म्हणजे काय? घरात."
"मग जरा ’अबक’ लाव, बघ ठाकरेच्या मातोश्रीवर वीज कोसळली. राज सोडून चालला बघ त्या बाळासाहेब ठाकरेना. म्हातारवयात काय बघावं लागतंय... त्यापेक्षा आपण बरे बुवा सगळे अगोदरच सोडून गेले आपणाला..."
झालं नानूकाका बाळासाहेबांच्या अव्यक्‍त दु:खाला आपल्या परिस्थितीनुसार समजावू लागले.
कधी कधी सकाळी सात वाजता नानूकाकांचा फोन,
"अगं विने, तुझा बापूस उठला का? त्याला म्हणावं सुट्‍टी आहे म्हणून झोपून का राहायचं? बघा जरा, सगळीकडे पाणीच पाणी झालंय जिल्ह्यात. गेल्या वीस वर्षांत असा पाऊस झाल्याचं आठवत नाही बघ."
इथे नानूकाका आमच्याच जिल्ह्यात झालेल्या पाऊसपाण्याला TVवर पाहण्याचा सल्‍ला देतात.
मला कधी कधी असं वाटतं नानूकाकासुद्‍धा भविष्यवाणी करतात. फ‍क्‍त तीच भविष्यं फार पूर्वी कुणीतरी केलेली असल्यामुळे नानूंच्या ’बघ मी म्हणत होतो ना’त तथ्य नसते.
"अबकड’वर दाखवलं (ते ’अबक’ आणि हे ’अबकड’ बरं का) २०१२ला जग संपणार. जगबुडी येणार. बघ मी सांगितलं नव्हतं का सगळं बुडणार म्हणून?"
तर कुठे हत्‍तींनी कसा हैदोस कसा घातला याचा पाठपुरावा जणू सरकारने यांनाच करायला सांगितल्याप्रमाणे स्वत: वनमंत्र्याच्या थाटात फटाके लावायला पुढे सरसावतात. आणि मग...? मग काय विचारता. हत्‍ती दिसले की काढतात पळ. हे फक्‍त नानूकाकांचंच कर्म असं काही नाही. गावातल्या बर्‍याचजणांचा हाच धंदा बरं का. मग यातून सुटका झाली की येतो आम्हाला फोन.
"धन्‍या, हत्‍ती घुसले रे बागेत. वाट लावली रे सगळ्याची."
"अहो, पण तुमची बागायती कुठे आहे? हल्लीच विकून मोकळे झालात ना."
"अरे, माझ्या गावात हत्‍ती आलेत. घरापाठीमागल्यांच्या बागांची नासधूस केली त्यांनी. मग काय ते बघायला जायला नको मला? मी आता नाय गेलो आणि उद्‍या माझ्या घरात घुसले मग काय करू मी? लोक म्हणतील, ’एकलाच होता. हत्‍तीनं आदळून टाकला असेल. बघायचं काय त्यात? आमच्या बागात घुसले तेवा नाय आला काय?’ तुज्यासारखं नाय रे जमायचं आमाला. तुमी काय नोकरदार माणसं... तुमच्या धंद्याचं नुसकान झाल्यार कळणार ते. तोपर्यंत..."
"हो, हो. बरोबर आहे तुमचं. बोला पुढे."
” अरे हो, सांगायचं हे होतं पेपरात फोटो आलाय."
"कुणाचा? हत्‍तींचा?"
"नाही रे बाबा," आता नानूकाका वैतागलेच. "हत्‍तींचा फोटो कसा काढणार? ते काय रमत-डुलत येतायत काय कर्नाटकातनं? आणि फोटो काढायला दिसायला तर हवे ना? आणि दिसले तरी हिंमत आहे का कुणात त्यांच्यासमोर जाऊन फोटो काढण्याची? सोंडेन ऊचलून फेकून देतील. तुजंपण ना कायतरीच आपलं. हां, तर मी काय बोलत होतो... फोटो."
"अरे व्वा, तुमचा फोटो आलाय तर पेपरात. नानूशेट पेपरात दिसणार तर हत्‍तीला पिटाळून लावताना."
"‍अरे हट रे. ह्त्‍ती गेले रे मोडून तोडून. आमी आपले बघायला गेलो. सोबत पत्रकार पण होते. TVर दाखवणार बोलले. हे अशे ठशे त्यांच्या येद्‍द्‍या खांबासारख्या पायांचे. येद्‍दे मोठे शेणाचे थाफे. ते बघून मग आमी एकेक जण मोडक्या केळीपाशी राहिलो उभे. आणि काय सांगू. पाठनं आला जगल्याचा मारका रेडा. असा ढोसा दिला..."
"कुणाला? तुम्हाला? तुम्ही ठीक तर आहात...?"
"अरे, आदी माजं ऐक रे सगळं. मग विचार काय ते. हां, तर रेडा आला आणि दिला ढकलून त्या पत्रकाराक. मग काय? आमी आपले हय-थय पळालो म्हणून वाचलो रे बाबा. आता रेड्यापुढे ही दशा तर हत्‍तीपुढे काय चलणार आमचा? बघ त्या मार लागलेल्या पत्रकाराचा फोटो आलाय पेपरात. त्याच्या बाजूला मी उभा आहे. ही..ही..ही..ही."
हे तर सांगितलं मी नानूकाकांच्या गावी आलेल्या पहिल्या पाहुण्याबद्‍दल. अजून दुसरा पाहुणा पण आला होता. तोही चक्‍क नानूकाकांच्या घरी. पण त्याबद्‍दल नंतर सांगेनच. गोष्ट अजून संपली नाही बरं का.
To be continued...

2 comments: